Thursday, April 26, 2007

नॉस्टाल्गिया

"दिल ढूंढता है"चाच पडसाद :)


गडद अंधाराला कापत चाललेली गाडी आठवते
रस्त्यापल्याड जंगलात चमकणारे काजवे
क्षितीजावर दूरच्या गावात उजळणारे दिवे
तेव्हा आत काहीतरी भुललं होतं

टेकाडावरुन लांबवर दिसणारा दर्या आठवतो
वाळूवर उमटणारी फेसाची नक्षी
लाटाना हुलकावण्या देणारे पक्षी
तेव्हा आत काहीतरी खुललं होतं

पिवळं धमक मोहरीचं पसरलेलं शेत आठवतं
लांबून ऐकू येणारी रहाटाची घुरघुर
नुमजणार्‍या दिशांतुन घुमणारे सुर
तेव्हा आत काहीतरी फुललं होतं

अजूनही डोळे मिटून क्षणात तिथे जाउन पोचते
भोवतालची गर्दी जाते हरवून
माझं मीपणही जातं विसरून
अजूनही आतवर काही हलत राहतं

Tuesday, April 10, 2007

दिल ढूंढता है...

कवी गुलज़ार यांची क्षमा मागून :-)


अधिर मनाला ओढ लागते मुग्ध मोकळ्या एकांताची
बसुनि केधवा स्वप्नं रेखली तुझ्या गोजिर्‍या सहवासाची...

थंड कोवळ्या सोनसकाळी ऊन हासरे घ्यावे लेऊन
विहरत जावे तुझ्या स्मृतीसव या स्वप्नातुन त्या स्वप्नातुन
ओढून घ्यावी पापण्यावरी झालर तुझिया स्नेहाची...

आणिक निवत्या सायंकाळी फुंकर घाली सांज समीरण
भान हरुनि लुटून घ्यावी आकाशी तार्‍यांची पखरण
उगीच द्यावी घ्यावी स्वत:शी शपथ उगवत्या चंद्राची...

कुठे दूरच्या निळ्या डोंगरी कवळुन घ्यावे जलद धुक्याचे
मुक्‍त मनाने पिऊन घ्यावे घुमणारे स्वर निवांततेचे
ओथंबुनि नयनात रहावी चाहुल भिजल्या निमिषांची...