Sunday, March 25, 2012

ओळख

जरि अंतरध्वनी ऐकले रोखुनि कितीदा
छेडली मनाची वीणा दिडदा दिडदा!
परि कळले नाही सूर कधी मज माझे;
जे भिडले ऐकुनि एकच त्या प्रतिसादा!

जरि गहिवर मनपटलावर मोरपिसाचे
फाकले लोलकातुनि झोत रंगांचे!
परि कळले नाही रंग कधी मज माझे;
जे खुलले अवचित प्रतिबिंबातुनि सांचे!

जरि शोधशोधले, मीच मला हे पुसले
गुंफले शब्द, गुंतले, किती मी फसले!
परि कळले नाही भाव कधी मज माझे;
जे प्रतिशब्दांच्या खेळातुन उलगडले!

4 comments:

प्रशांत said...

१. "परि कळले नाही भाव कधी मज माझे" - मस्त! छान!

२. कुसुमाग्रजांच्या "समिधाच सख्या या" किंवा "नवलाख तळपती दीप" या कवितांच्या मीटरसह यमकांची AABA अशी रचनाही मस्तच जमली आहे.

३. अनेक महिन्यांनी/वर्षांनी हा ब्लॉग वर आलेला पाहून आनंद झाला.

Mandar Gadre said...

फार, फार सुरेख! अप्रतिम लय, सुरेख कल्पना. वाह! :)

Nandan said...

फार सुरेख!

Sumedha said...

धन्यवाद!