Saturday, November 12, 2022

मुशफिरी

रोजचीच मुशफिरी करताना हा प्रश्न नेहेमीच पडतो
शेजारच्या गाडीत बसलेला तो  कुठे निघाला असेल?
इतक्या गडबडीत रस्ता ओलांडणारी ती कसल्या घाईत असेल?
पलीकडच्या कट्ट्यावर विडी ओढणारे ते असेच दिवसभर इथे घुटमळतात 
की कामातून थोडा काळ विसावा आहे हा?

हा कुठून आला, ती कुठे चाललीए? 
ही खुष दिसतीए, तो कसल्या चिंतेत आहे?
ते दोघे भांडतायत का? का भांडतायत?
त्या दोघी आज दिवसभर खरेदी करतील?
ते सगळे मिळून काय ठरवतायत्? 
ते कोणाची वाट बघतायत्?

किती तरी प्रश्न... त्यामागच्या कितीतरी कथा!
नकळत त्या गुंफताना कोणाशी तरी नजरानजर होते... 
कल्पनांची साखळी तुटते, कथा अर्ध्यावर थांबतात... 
दोघेही हसून न हसल्यासारखे करत चालत राहतो... 

तोही हाच विचार करत असेल का?
"ही कुठून आलीये? कुठे चाललीए?"

Thursday, November 05, 2015

विणकर दादा

विणकर दादा मला शिकव ना कसे विणावे वस्त्र मुलायम!
काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम?
कितीक वेळा बघीतले तुज, तुटता, सुटता बारीक धागा
हलक्या स्पर्शे जुळवुनी घेशी, विणत राहशी अखंड तागा!
फिरुनि बघावे गाठ कुठे का, शोधुनिही मज सापडते ना!
चूक नसे पोतात जराशी, खोट नक्षीची कुठे दिसेना!
पदर असूदे जरतारीचा, असेल अथवा शाल सुताची,
असेल नाजुक, असेल भक्कम, कारागिरि पण त्याच तोडिची!
कधी एकदा मी हौसेने एकच नाते होते विणले,
विणता विणता चुकले होते, चुकता चुकता विणत राहिले!
सगळ्या उणिवा, सा-या खोचा अजुनी सहजच मजला दिसती
विणकर दादा, मला शिकव ना मखमाली वस्राची युक्ती!

मूळ कविता :

मुझको भी तरकीब सिखा दो यार ज़ुलाहे!
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते,
जब कोइ तागा टूट गया या ख़तम हुआ,
फिर से बांधके, और सिरा कोइ जोड के उसमे -
आगे बुनने लगते हो!
तेरे इस तानेमें लेकिन एक भी गांठ-गिरह बुंदरकी देख नहीं सकता कोई ...
मैंने तो एक बार बुना था एकही रिश्ता,
लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे!
मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे ...
-गुलजार

Friday, March 01, 2013

बावरा मन ...

स्वप्नरंगी मन रंगुन जावे खुळ्या मनाची आस खुळी,
मनराज्याच्या उंबरठ्यावर सजवुनि रचली रास खुळी!

खुळी गुपीते खुळ्या मनाची,
खुळी स्पंदने निश्वासांची!
झोकुनि लहर खुळ्या निद्रेची,
खुळ्या झरोक्यातुनी शोधते - खुळे नजारे नजर खुळी!

खुळ्याच जगती, खुळा सोबती,
हात असावा तुझाच हाती!
खुळ्या सुरांच्या खुळवट पंक्ति,
खुळावल्या तालावर झिंगुनि - खुळ्या पदांची चाल खुळी!

नीरव रात, खुळा एकांत,
मंद तेवते खुळीच ज्योत!
नकळत हुरहुर का हॄदयात,
चंचल अल्लड अन् पदराची - खुळीच चुळबुळ, धुंदी खुळी!

स्वानंद किरकिरे यांच्या मूळ हिंदी कवितेचा अनुवाद.

Thursday, August 23, 2012

हे जलदांनो

खचित घडते भास्करदर्शन क्वचितच नभहि नितळ निळे
क्षितिजापासून क्षितिजापरति जलदालागुनि जलद पळे!
गडद जांभळे, काळे, करडे,  ओथंबुन तम झाकळता,
हट्टी, लहरी, थांबुन, परतुन, धरणीवरि झोकुनी देता!
फसवून, हसवुन, हूल देउनि, कधी पसरुनि, झिरझिरुनी,
देता रविला कोंदण हसण्या, किरणांची ओंजळ भरुनी!
कधी धवल अन् हसरे - फुगरे, लेउन झालर चंदेरी,
नितळ निळ्या त्या अथांगतेवर चित्र रेखता जरतारी!
सांज-सकाळी कधी गुलाबी, कधी केशरी रंगभरे,
सर्वांगी कधि, कधी किनारी, विस्फारुनि हलके-गहिरे!
होउनि प्रतिभा तुम्ही बरसता, तुम्हारुपें काव्यानुभुती,
प्रीयकराचे दूत तुम्ही, तुम्हीच कविचे सांगाती!
भान हरपुनि तुम्हांस बघता, क्षितीजापरति नजर झुके 
हे जलदांनो, तुम्हावाचुनि अपार नभही दिसे फिके!

Saturday, April 14, 2012

वाढताना

मातीच्या कुशीत झोपून होते तेव्हा वाटत होतं
त्या शेजारच्या रोपट्या सारखं व्हायचं
मजेत थोडेसेच हात पाय पसरले तर येईल बहार!

मातीच्या बाहेर डोकं काढून बघितलं
मग दिसली पलिकडची वेल
तेव्हा वाटलं तिच्यासारखं मोकळं ढाकळं वाढायचं
आकाशाला भिडायची जिद्द ठेवत जगायचं

मग मान अजून उंचावल्यावर कळलं
ज्याच्या सावलीत विसावले होते तो मोठा वृक्ष,
झालं... ओढ लागली त्याच्यासारखं मोठं व्हायची
असंच व्हायला पहिजे धीरगंभीर प्रगल्भ!

असं - तसं व्हायचं म्हणून नसेल कदाचित
पण आपसुकच, निसर्गनियमानीच असणार
रुजेल तशी, जमेल तशी वाढत राहीले!

आणि एकदा मागे वळून बघताना कळलं
कधीच झाले नाही त्या रोपासारखी
त्या वेलीसारखी
त्या वृक्षासारखी

 झाले फक्‍त माझ्यासारखी!
मुक्यानी प्रेरणा देत राहिले होतेच की ते
आणि मनातल्या मनात हसत पण राहिले असणार!

त्यांना तरी कुठे मी हवी होते त्यांच्या सारखी व्हायला?

Sunday, March 25, 2012

ओळख

जरि अंतरध्वनी ऐकले रोखुनि कितीदा
छेडली मनाची वीणा दिडदा दिडदा!
परि कळले नाही सूर कधी मज माझे;
जे भिडले ऐकुनि एकच त्या प्रतिसादा!

जरि गहिवर मनपटलावर मोरपिसाचे
फाकले लोलकातुनि झोत रंगांचे!
परि कळले नाही रंग कधी मज माझे;
जे खुलले अवचित प्रतिबिंबातुनि सांचे!

जरि शोधशोधले, मीच मला हे पुसले
गुंफले शब्द, गुंतले, किती मी फसले!
परि कळले नाही भाव कधी मज माझे;
जे प्रतिशब्दांच्या खेळातुन उलगडले!

Wednesday, June 16, 2010

शब्द

शब्दांची रांगोळी, शब्दांची होळी
शब्दांनी भरूनही रिकामी झोळी!
शब्द कधी बोचरे, शब्द तसे खरे
तरी अर्थाविण शब्दही बिचारे!
कधी शब्द सुके, आणि शब्द फुके
अनाठायी तसे शब्दही मुके!
शब्दांची आरास, शब्दांनी आभास
फुक्या शब्दांचा नकोच अट्टाहास!

शब्दच सुंदर, शब्दांची फुंकर
सदिच्छेच्या वस्त्राला शब्दांची झालर!
शब्दांची पखरण, शब्दांची शिंपण,
विचारांच्या रत्नाला शब्दाचं कोंदण!
शब्द देती हूल, शब्दांची भूल
भावनेच्या प्रवासाला शब्दांची झूल!
शब्दांची गाज, शब्दांचा बाज
कल्पनेच्या रुपाला शब्दांचा साज!