Friday, February 16, 2007

पुन्हा त्रिवेणी

वणवण फिरले स्वत:च्याच सावलीचा गारवा शोधत
सावलीही कसली बेरकी, तीही राहिली चकवत
...
शेवटी गारवा सापडला, सावलीचा निरोप घेतल्यावर!

साद घातली नाही, तरी पडसाद येत राहिले कुठूनतरी
खडा फेकला नाही, तरी तरंग उमटत राहिले हळुवारी
...
मग कळलं, आता तरी प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे!

लहानपणी खिदळत सुटायचे अगदी पाणी येइतो डोळ्यातून
आणि इतकुसं दुखलं खुपलं तरी रडायचे भोकाड पसरून
...
अश्रू शिकले तेव्हाच, मी अजून शिकतीये, "सुख दु:खे समे कृत्त्वा"!

7 comments:

hemant_surat said...

शब्दं वाचता वाचता स्पीडची नशा चढली
आपण खूप वाचतो, याचीच खुशी वाढली
शब्दांना अर्थ समजले, मी अजूनही चाचपडतोय!

हेमंत_सूरत

hemant_surat said...

लहानपणी प्रश्नं विचारायचो नको तितके!
उत्तर कोणी द्यायचे नाही वर म्हणायचे तू लहान आहेस.
आता प्रश्न पडतो की प्रश्नं का पडत नाही
आणि उत्तर मिळालं की त्यातून मात्रं नवीन प्रश्नं मिळतात!

वैभव जोशी said...

साद घातली नाही, तरी पडसाद येत राहिले कुठूनतरी
खडा फेकला नाही, तरी तरंग उमटत राहिले हळुवारी
...
मग कळलं, आता तरी प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे!

मस्त ...

सुमेधाजी माझ्या माहितीनुसार त्रिवेणीलाही एक मीटर असतं ना? की तसं आवश्यक नाहीए?आपल्याला माहिती असेल तर कळवाल प्लीज? cbdg

स्वाती आंबोळे said...

>>>> मग कळलं, आता तरी प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे!

वा! मस्त!

'कितीतरी गोष्टी' पण आवडली.
'आंतर अग्नी' हं? किती समर्पक! हे सुचल्याबद्दल स्पेशल अभिनंदन!! :)
'आमची अन्यत्र शाखा आहे' पण सहीच!! :)

Sumedha said...

धन्यवाद!

स्वाती, 'आमची अन्यत्र शाखा आहे' हे कोणाच्यातरी ब्लॉग वरून ढापलेले आहे, त्यामुळे त्याचे श्रेय घेत नाही ;)

Anonymous said...

त्रिवेणी सुंदर जमली आहे!

कृपया मी वर दिलेली प्रतिक्रिया उडवू (delete) शकता का? तेथिल दुवा मनपाखरूला जातो - ती माझी अनुदिनी नाही. प्रतिक्रिया छापतांना माझ्या संगणकावर काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. आपले शतशः आभार!

a Sane man said...

chhan...