Thursday, November 05, 2015

विणकर दादा

विणकर दादा मला शिकव ना कसे विणावे वस्त्र मुलायम!
काय युक्ती की मंत्र जादुचा, काय शिताफी करिसी कायम?
कितीक वेळा बघीतले तुज, तुटता, सुटता बारीक धागा
हलक्या स्पर्शे जुळवुनी घेशी, विणत राहशी अखंड तागा!
फिरुनि बघावे गाठ कुठे का, शोधुनिही मज सापडते ना!
चूक नसे पोतात जराशी, खोट नक्षीची कुठे दिसेना!
पदर असूदे जरतारीचा, असेल अथवा शाल सुताची,
असेल नाजुक, असेल भक्कम, कारागिरि पण त्याच तोडिची!
कधी एकदा मी हौसेने एकच नाते होते विणले,
विणता विणता चुकले होते, चुकता चुकता विणत राहिले!
सगळ्या उणिवा, सा-या खोचा अजुनी सहजच मजला दिसती
विणकर दादा, मला शिकव ना मखमाली वस्राची युक्ती!

मूळ कविता :

मुझको भी तरकीब सिखा दो यार ज़ुलाहे!
अक्सर तुझको देखा है के ताना बुनते,
जब कोइ तागा टूट गया या ख़तम हुआ,
फिर से बांधके, और सिरा कोइ जोड के उसमे -
आगे बुनने लगते हो!
तेरे इस तानेमें लेकिन एक भी गांठ-गिरह बुंदरकी देख नहीं सकता कोई ...
मैंने तो एक बार बुना था एकही रिश्ता,
लेकिन उसकी सारी गिरहें साफ़ नज़र आती है मेरे यार जुलाहे!
मुझको भी तरकीब सिखा दो यार जुलाहे ...
-गुलजार

Friday, March 01, 2013

बावरा मन ...

स्वप्नरंगी मन रंगुन जावे खुळ्या मनाची आस खुळी,
मनराज्याच्या उंबरठ्यावर सजवुनि रचली रास खुळी!

खुळी गुपीते खुळ्या मनाची,
खुळी स्पंदने निश्वासांची!
झोकुनि लहर खुळ्या निद्रेची,
खुळ्या झरोक्यातुनी शोधते - खुळे नजारे नजर खुळी!

खुळ्याच जगती, खुळा सोबती,
हात असावा तुझाच हाती!
खुळ्या सुरांच्या खुळवट पंक्ति,
खुळावल्या तालावर झिंगुनि - खुळ्या पदांची चाल खुळी!

नीरव रात, खुळा एकांत,
मंद तेवते खुळीच ज्योत!
नकळत हुरहुर का हॄदयात,
चंचल अल्लड अन् पदराची - खुळीच चुळबुळ, धुंदी खुळी!

स्वानंद किरकिरे यांच्या मूळ हिंदी कवितेचा अनुवाद.

Thursday, August 23, 2012

हे जलदांनो

खचित घडते भास्करदर्शन क्वचितच नभहि नितळ निळे
क्षितिजापासून क्षितिजापरति जलदालागुनि जलद पळे!
गडद जांभळे, काळे, करडे,  ओथंबुन तम झाकळता,
हट्टी, लहरी, थांबुन, परतुन, धरणीवरि झोकुनी देता!
फसवून, हसवुन, हूल देउनि, कधी पसरुनि, झिरझिरुनी,
देता रविला कोंदण हसण्या, किरणांची ओंजळ भरुनी!
कधी धवल अन् हसरे - फुगरे, लेउन झालर चंदेरी,
नितळ निळ्या त्या अथांगतेवर चित्र रेखता जरतारी!
सांज-सकाळी कधी गुलाबी, कधी केशरी रंगभरे,
सर्वांगी कधि, कधी किनारी, विस्फारुनि हलके-गहिरे!
होउनि प्रतिभा तुम्ही बरसता, तुम्हारुपें काव्यानुभुती,
प्रीयकराचे दूत तुम्ही, तुम्हीच कविचे सांगाती!
भान हरपुनि तुम्हांस बघता, क्षितीजापरति नजर झुके 
हे जलदांनो, तुम्हावाचुनि अपार नभही दिसे फिके!

Saturday, April 14, 2012

वाढताना

मातीच्या कुशीत झोपून होते तेव्हा वाटत होतं
त्या शेजारच्या रोपट्या सारखं व्हायचं
मजेत थोडेसेच हात पाय पसरले तर येईल बहार!

मातीच्या बाहेर डोकं काढून बघितलं
मग दिसली पलिकडची वेल
तेव्हा वाटलं तिच्यासारखं मोकळं ढाकळं वाढायचं
आकाशाला भिडायची जिद्द ठेवत जगायचं

मग मान अजून उंचावल्यावर कळलं
ज्याच्या सावलीत विसावले होते तो मोठा वृक्ष,
झालं... ओढ लागली त्याच्यासारखं मोठं व्हायची
असंच व्हायला पहिजे धीरगंभीर प्रगल्भ!

असं - तसं व्हायचं म्हणून नसेल कदाचित
पण आपसुकच, निसर्गनियमानीच असणार
रुजेल तशी, जमेल तशी वाढत राहीले!

आणि एकदा मागे वळून बघताना कळलं
कधीच झाले नाही त्या रोपासारखी
त्या वेलीसारखी
त्या वृक्षासारखी

 झाले फक्‍त माझ्यासारखी!
मुक्यानी प्रेरणा देत राहिले होतेच की ते
आणि मनातल्या मनात हसत पण राहिले असणार!

त्यांना तरी कुठे मी हवी होते त्यांच्या सारखी व्हायला?

Sunday, March 25, 2012

ओळख

जरि अंतरध्वनी ऐकले रोखुनि कितीदा
छेडली मनाची वीणा दिडदा दिडदा!
परि कळले नाही सूर कधी मज माझे;
जे भिडले ऐकुनि एकच त्या प्रतिसादा!

जरि गहिवर मनपटलावर मोरपिसाचे
फाकले लोलकातुनि झोत रंगांचे!
परि कळले नाही रंग कधी मज माझे;
जे खुलले अवचित प्रतिबिंबातुनि सांचे!

जरि शोधशोधले, मीच मला हे पुसले
गुंफले शब्द, गुंतले, किती मी फसले!
परि कळले नाही भाव कधी मज माझे;
जे प्रतिशब्दांच्या खेळातुन उलगडले!

Wednesday, June 16, 2010

शब्द

शब्दांची रांगोळी, शब्दांची होळी
शब्दांनी भरूनही रिकामी झोळी!
शब्द कधी बोचरे, शब्द तसे खरे
तरी अर्थाविण शब्दही बिचारे!
कधी शब्द सुके, आणि शब्द फुके
अनाठायी तसे शब्दही मुके!
शब्दांची आरास, शब्दांनी आभास
फुक्या शब्दांचा नकोच अट्टाहास!

शब्दच सुंदर, शब्दांची फुंकर
सदिच्छेच्या वस्त्राला शब्दांची झालर!
शब्दांची पखरण, शब्दांची शिंपण,
विचारांच्या रत्नाला शब्दाचं कोंदण!
शब्द देती हूल, शब्दांची भूल
भावनेच्या प्रवासाला शब्दांची झूल!
शब्दांची गाज, शब्दांचा बाज
कल्पनेच्या रुपाला शब्दांचा साज!

Wednesday, November 18, 2009

बिती ना बितायी रैना

पुन्हा एकदा कवी गुलजार यांची क्षमा मागून :)

रात सरता सरेना, रात विरहे सजली
भिजलेल्या पापणी, रात कधीची विझली!

क्षण गेले हरवून, पुन्हा येतील कवेत?
विसरली ओळखही, कोणी घालेल का साद?
चांदण्याचे लेणे लेई, रात साजरी निजली
नीज हरवल्या नेत्री, रात कधीची विझली!


किती ऋतू ग सरले, गेली कितीतरी युगे
अन् रेंगाळले क्षण स्फुट आठवाचे मागे
असत्याहून ठिक्कर, रात काळोखी भासली!
रुसलेल्या नजरेत, रात कधीची विझली!

Thursday, September 11, 2008

चांद लबाड

नीरव राती
चाहूल कोणाची गे?
चांद लबाड...

दुधी चांदणे
सांडते पसरते!
पाण्यावरती...

नाजुक लाटा
छेडत जाई कोण?
चुकार वारा...

वार्‍यावरती
गंध तरंगे मंद!
बकुळ फु्ले...

फुलांपल्याड
तो कोठे हरवला?
चांद लबाड!


सईला धन्यवाद!

Sunday, August 24, 2008

दार

असं होतं बघ...
एक किलकिलं दार थोडं ढकलून बघितलं
तर आतल्या कोणीतरी जोरात हुसकावून लावलं!
आता सताड उघडलेल्या दारासमोरून जाताना
मान वर करून बघतच नाही!

असं होतं बघ...
दार जरा जरी किलकिलं अर्धं उघडं ठेवलं
तर कोणीतरी फाजिल कुतूहलानं डोकावून बघितलं
मग वार्‍याची झुळूक नाही आली तरी चालेल,
पण दार घट्ट लावूनच घेते!

असं होतं बघ...
एक कडीकुलुपातलं गच्च दार, कधीही न उघडणारं
आपल्याच समाधानासाठी जीव तोडून ठोठावलं!
आता ठोठावण्याची वाट पाहणारी दारं आहेत
हे लक्षातच कसं येत नाही!

असं होतं बघ...
कोणी हलकसं जरी वाजवलं ना,
तरी खुल्या दिलानं स्वागत करीन मी!
पण लोक तरी काय वेडे असतात,
कडी-कुलुपातली दारं वाजवत बसतात!

असं होतं बघ...
कुठल्यातरी दारासमोरून जाताना
कुठल्यातरी धुकट कारणासाठी रेंगाळले!
आणि दार अचानक उघडून ओळखीचं जग भेटलं!
आता असलेली दारं सुद्धा दिसत नाहीत!

असं होतं बघ...
दार बंद आहे हे लक्षातच नव्हतं
आपसूक कधी उघडलं तेही नाही कळलं!
आणि बाहेरचं जग असं उराउरी भेटलं
आता दाराची गरजच वाटत नाही!

असं होतं बघ!

Monday, May 05, 2008

नकोच सांगू!

चांदण्यांचे आवाज,
अंधाराचे हुंकार,
धुक्याची कुजबुज,
कळ्यांचे नकार
...नकोच सांगू!

पाषाणाची स्वप्नं,
स्वप्नांमधली जाग,
रक्तामधले प्रश्न,
पाण्यामधली आग
...नकोच सांगू!

एकांताची चाहूल,
थबकलेली वेळ,
जागृतीची भूल,
कल्पनांचे खेळ

सारे कल्पनांचे खेळ
...नकोच सांगू!

Friday, June 29, 2007

पावसात भिजावं

पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

नको, वारा खूप सुटलाय
उगीच सर्दी ताप होईल
एकदा नव्हता का झाला, तसा!

पण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

कोणी बघितलं तर हसेल
हे काय लहान मुलांसारखं वागायचं
नाचावंसं वाटलं म्हणून नाचत सुटायचं?

पण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

खिडकीत बसून मस्त मजा बघावी
आडोशाला कसे मस्त तुषार येतात झेलता
त्याची गंमत थोडीच मुसळधार पावसात?

पण पावसात चिंब भिजावंसं वाटतंय..

जोर कमीच झालाय बहुतेक आता
पुन्हा येईलच की अशी मोकळी सर
तेव्हा मात्र नक्की घेइन भिजून!

पण खरंच पावसात भिजावंसं वाटतंय का?

Thursday, April 26, 2007

नॉस्टाल्गिया

"दिल ढूंढता है"चाच पडसाद :)


गडद अंधाराला कापत चाललेली गाडी आठवते
रस्त्यापल्याड जंगलात चमकणारे काजवे
क्षितीजावर दूरच्या गावात उजळणारे दिवे
तेव्हा आत काहीतरी भुललं होतं

टेकाडावरुन लांबवर दिसणारा दर्या आठवतो
वाळूवर उमटणारी फेसाची नक्षी
लाटाना हुलकावण्या देणारे पक्षी
तेव्हा आत काहीतरी खुललं होतं

पिवळं धमक मोहरीचं पसरलेलं शेत आठवतं
लांबून ऐकू येणारी रहाटाची घुरघुर
नुमजणार्‍या दिशांतुन घुमणारे सुर
तेव्हा आत काहीतरी फुललं होतं

अजूनही डोळे मिटून क्षणात तिथे जाउन पोचते
भोवतालची गर्दी जाते हरवून
माझं मीपणही जातं विसरून
अजूनही आतवर काही हलत राहतं

Tuesday, April 10, 2007

दिल ढूंढता है...

कवी गुलज़ार यांची क्षमा मागून :-)


अधिर मनाला ओढ लागते मुग्ध मोकळ्या एकांताची
बसुनि केधवा स्वप्नं रेखली तुझ्या गोजिर्‍या सहवासाची...

थंड कोवळ्या सोनसकाळी ऊन हासरे घ्यावे लेऊन
विहरत जावे तुझ्या स्मृतीसव या स्वप्नातुन त्या स्वप्नातुन
ओढून घ्यावी पापण्यावरी झालर तुझिया स्नेहाची...

आणिक निवत्या सायंकाळी फुंकर घाली सांज समीरण
भान हरुनि लुटून घ्यावी आकाशी तार्‍यांची पखरण
उगीच द्यावी घ्यावी स्वत:शी शपथ उगवत्या चंद्राची...

कुठे दूरच्या निळ्या डोंगरी कवळुन घ्यावे जलद धुक्याचे
मुक्‍त मनाने पिऊन घ्यावे घुमणारे स्वर निवांततेचे
ओथंबुनि नयनात रहावी चाहुल भिजल्या निमिषांची...

Tuesday, February 27, 2007

कशी मी

कळेना मलाही कशी मी, कशी मी?
उगा का पुसावे, जशी मी तशी मी!

कधी मौन ओढून माझ्याच कोषी
कधी बोलकी मुक्‍त मैना जशी मी

कधी पाय उचलून उमद्या धिराने
कधी आत्मसंदेही कैदी जशी मी

कधी घेउनि हाती नेतृपताका
कधी चालते मागुतिही अशी मी

कधी वाहते सत्यओझे उराशी
कधी राहते स्वप्नवेडी जशी मी

कशी मी असे गूढ माझे मलाही
तुझी ना सखी मी? जशी मी तशी मी!

Friday, February 16, 2007

पुन्हा त्रिवेणी

वणवण फिरले स्वत:च्याच सावलीचा गारवा शोधत
सावलीही कसली बेरकी, तीही राहिली चकवत
...
शेवटी गारवा सापडला, सावलीचा निरोप घेतल्यावर!

साद घातली नाही, तरी पडसाद येत राहिले कुठूनतरी
खडा फेकला नाही, तरी तरंग उमटत राहिले हळुवारी
...
मग कळलं, आता तरी प्रश्न विचारायला शिकलं पाहिजे!

लहानपणी खिदळत सुटायचे अगदी पाणी येइतो डोळ्यातून
आणि इतकुसं दुखलं खुपलं तरी रडायचे भोकाड पसरून
...
अश्रू शिकले तेव्हाच, मी अजून शिकतीये, "सुख दु:खे समे कृत्त्वा"!

Tuesday, February 06, 2007

मनातल्या मनात

मनातल्या काळोखाला
मनातल्याच सूर्यानी दूर करायचं
मनातल्या प्राजक्‍ताच्या
मनातल्याच गंधानं मोहरून जायचं

मनातल्या पावसानं
मनातलीच माती दरवळत रहावी
मनातला पिंजरा उघडून
मनातल्याच पक्ष्यानं भरारी घ्यावी

मनातल्या उन्हात
मनातच कुठेतरी सापडते सावली
मनातल्या पिल्लाला
मनातलीच गोंजारते हळूवार माउली

मनातल्या सुरांवर
मनातलेच बोल धरतात ठेका
मनातल्या डहाळीवर
मनानीच बांधलाय झोकदार झोका

मनाला विचारलं
"मनामधे इतकं सारं आलं कुठून?"
मन हसून उत्तरलं
"मनाचीच दारं किलकिली करून!"

Thursday, January 25, 2007

कितीतरी गोष्टी

कितीतरी गोष्टी
करायच्या राहून गेल्या
सांगायच्या राहून गेल्या
विचारायच्या राहून गेल्या

वेळोवेळी ठरवल्या होत्या करायच्या

कधीकाळी नोंद करून ठेवायचे
विसरू नये म्हणून

आता तर त्या नोंदीच हरवून गेल्यात कुठेतरी!

आणि नोंदींशिवाय केलेल्या गोष्टीच तरळत राहिल्यात!
सपकन् पडून जाणार्‍या पावसाच्या सरीसारख्या...

Thursday, December 07, 2006

पीटर ग्राइम्स् ची झलक

कोण्या एका ब्लॉगवर हा कवितेचा तुकडा वाचला. तुकडा, कारण एका दीर्घकवितेचा हा एक छोटा भाग आहे. डोळ्यापुढे एक चित्र उभं राहिलं, मग शब्दांचा थोडासा खेळ केला!

तर पीटर ग्राइम्स् ची ही झलक, with a twist!

Thus by himself compelled to live each day,
To wait for certain hours the tide's delay;
At the same times the same dull views to see,
The bounding marshbank and the blighted tree;
The water only, when the tides were high,
When low, the mud half-covered and half-dry;
The sunburnt tar that blisters on the planks,
And bankside stakes in their uneven ranks;
Heaps of entangled weeds that slowly float,
As the tide rolls by th' impeded boat.

- George Crabbe. Peter Grimes from The Borough.

जणू जगतो बघण्या रोज रोजचा खेळ
मोजतो प्रहर लाटांचा घालित मेळ!
दररोज दिसे ते पाणी, तोच किनारा
तरु पोखरलेले, तनुवर तोच शहारा.
अन् भरती येता तुडुंब भरता खाडी
ओहटी लागता, चिखल सुका राखाडी.
गुंतुनि तरंगे, गवतहि घेइ विसावा
हलकेच ढकलती लाटा निजल्या नावा!

"येईन उद्याही बघण्या हाच पसारा
की डुंबुनि कायम इथेच घेउ निवारा?"

Friday, November 17, 2006

त्रिवेणीची वेणी

क्षणभर मी ओळखलंच नाही, खूप वर्षांनी ती भेटली
तरी एक नुसतं स्मित फाकलं आणि ओळख पटली
...
चेहरे हरवले तरी डोळ्यातलं हासू कसं जपून राहतं?


शाई विटून गेली तरी वाचता येतातच की जुनी पानं
शब्द फुटत नसले तरी कानात घुमतं ना जुनं गाणं!
...
वह्या न् तबकड्यांचं ओझं उगीच वाहत राहतो आपण!


उन्हाचे कवडसे जुन्या घराच्या खिडकीत घेउन जातात
पावसाचे थेंब परसातल्या झाडाखाली नेउन सोडतात
...
आठवणींना सुद्धा लागतातच का निमित्तांचे हिंदोळे?

Thursday, November 02, 2006

चालविता

"आता फक्‍त इतकंच हं"
असं सांगत सांगत इथपर्यंत आणलंस
प्रत्येक टप्प्यावर वाटायचं की "झालंच आता"
आणि सगळं आवसान गोळा करायचे मी
पुन्हा एकदा

आता मागे वळून बघतीये
तेव्हा कळतंय की किती मोठा डोंगर चढून आले

पण एक विचारते, स्वत:लाच
पायथ्याशीच जर बोलला असतास की डोंगर चढून जायचाय
तर खरंच बसकण मारली असती का मी?

कुणास ठाउक कदाचित
उत्साहानी, निश्चयानी, दमानी चढलेही असते
माझी मी!