Monday, October 16, 2006

उसनेपणा

मान उंच करून, डोळे जरा उघडून, आजूबाजूला बघितलं

तिचं दु:ख पाहून थोडीशी कळवळले
तिचे अश्रू पुसायला खोटं अवसान कुठून आलं माझ्याकडे?

त्याच्या वेदना पाहून जराशी उसासले
त्याला क्षणभर हसवायला उसनी विनोद बु्द्धी कुठून आली माझ्याकडे?

त्यांची अगतिकता पाहून किंचित धपापले
त्यांना समजाऊन थोपवायला ठेवणीतला शहाणपणा तरी कुठून आला माझ्याकडे?

मग डोळे मिटून माझी मी जेव्हा असते...

माझेच अश्रू का अनावर होतात?
माझीच निराशा का उतू जात राहते?
माझाच वेडेपणा का वेडावत राहतो?

Monday, October 09, 2006

एकांत

असुनि सारे निकट तरिही, मज हवा एकांत हा
दूर सारे सारुनिया जवळ घे एकांत हा

भक्‍तगजरी दंग झाले, सत्य परि ना गवसले
मन्मनाला चिन्मयाची जाण दे एकांत हा

क्षण जसे कण वालुकेचे, घट्ट पकडू पाहिले
गळुनी जाता सर्व काही हाती ये एकांत हा

सत्य दे आव्हान नेमे, दोन हाते झुंजले
थकुनि जाता शरण सत्या, स्वप्नी ने एकांत हा

स्तुति कधी, निंदाच बहुधा, शांत चित्ते ऐकले
सत्य माझे रुप मजला दावी गे एकांत हा

गुपित

वार्‍याच्या झुळकेनी गोल गिरकी घेतली
मनोमन कोणीतरी शीळ का हो घातली?

सूर्याच्या किरणांनी नक्कीच जादू केली
फुला-पानांत मोतियाची माळ कशी हासली?

ढग बिचारे वार्‍यासोबत भरकटत चालले
मी कशी त्यात खुळी चित्रं काढत राहिले?

एका छोट्या पाखरानी टुणकन उडी मारली
मला कशी डौलदार एक बॅलेरिना दिसली?

उन्हात नागडा पाऊस पुरा दोनच क्षण पडला
डोळे मिटले तरी कसा धनु दिसत राहिला?

आरशात बघता एक सुंदर प्रतिबिंब उमटलं
खरं तर मनातलंच गुपित की हो प्रकटलं...

आशा

तपत्या प्रखर उन्हाने धरती विराण आहे
घन दूर एकटा तो, तरिही अजाण आहे

हलक्या विरल धुक्याची ओढून शाल, वेडी
कळी वाट पाहताहे, रवी बेइमान आहे

चढत्या गडद तमाने, भवती भयाण होता
चमके, लपे चुकार, जुगनू गुमान आहे

थकल्या रखड गतीने चलता न वाट संपे
दिसती पल्याड लहरी, का भासमान आहे

पगल्या चपळ मनाला कशी आवरू कळेना
हरले तरी हरेना, आशाच प्राण आहे

रात्र

मागच्या काही दिवसातलं चढलेलं गाणं म्हणजे परिणीता मधलं "रात अकेली तो, चांद की सहेली है".

खूप दिवसांपासून, विशेषत: गायत्रीची ही नोंद वाचून, आपणही एक गज़ल "पाडावी" अशी खुमखुमी होती!

या दोन्हीची परिणती या खालच्या बापुड्या प्रयत्नात झाली आहे!

कितीतरी दिवसांनी थकून भागून रात्र आली
कितीतरी हक्कानी हाकून, मागून रात्र आली

चांदण्यांच्या गर्दीमधे एकांताला शोधत राहिले
चांदण्याला सुद्धा एकटे मागे टाकून रात्र आली

अंधार भवती दाटून येता मीच दिवे उजळत गेले
आज तरी कशा सगळ्या ज्योती फुंकून रात्र आली

कधीपासून मनामधे कितीतरी जपत आले
तेच सारे ऐकायचेय्, असे सांगून रात्र आली

गडद सारे चहूकडे, ओळखीचेही अजाण झाले
आपुलकीचे मैत्र हळवे सोबत घेऊन रात्र आली

कधी एकदा

अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी
आणि मनाच्या आकाशातुन मनोरथांची आतषबाजी

असाच येतो कधी एकदा आठवणींना पूर केव्हढा
आणि मनाच्या कुपीत राही दरवळणारा गंध-केवडा

अशाच येती कधी एकदा सैरभैरही विचारधारा
आणि मनाच्या चित्री उमटे आकांक्षांचा मोरपिसारा

अशीच होते कधी एकदा श्रद्धासुमनांची उधळण
आणि मनाच्या गाभार्‍यातुन भावभक्‍तीची ओंजळ अर्पण

असेही येती कधी एकदा रिते हुंदके उदासवाणे
तरीहि मनाला हसवत खेळत गात रहावे जीवनगाणे

मुखडा

"आपुला संवाद आपणासी" सुरु केले तेव्हा तिथे काही कविता उतरतील अशी कल्पना किंवा योजना नव्हती. हळू हळू जुन्या पुराण्या कविता आठवून त्या नोंदल्या, तर कधी त्यांना नवीन साज चढवायचे सुचून गेले. आणि कधी कधी तर "गज़ल पहावी रचून" या हट्टाने गज़ल मिश्रित कविता उतरल्या. क्या करे आजकल मिज़ाज ही कुछ शायराना है!

शाळेत असताना अक्षरश: र ला र आणि ट ला ट जुळवून केलेल्या कविता आठवल्या की आता हसू येते. पण त्याही वेळेला घरी दारी त्याचे भरपूर कौतुक करून घेतले. माझा एक दादा तर येता जाता "काय कवयित्री बाई" म्हणून चिडवायचा, तेव्हा जाम गुदगुल्या व्हायच्या, खोटे कशाला बोलू? तशी आता काही फार प्रगति आहे अशातला भाग नाही, पण एक वेगळा ब्लॉग सुरु करावा असा विचार मनात येण्या इतपत नक्कीच आहे! आणि या ब्लॉगला कवी कुसुमाग्रजांच्या ओळींनी स्फूर्ती दिली तर काय नवल? अर्थात सुजाण वाचकांनी यात कुठेही माझी उडी त्यांच्या जवळपासही फिरकण्याचा प्रयत्न आहे असा कटु गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंति. पण "राजहंसाचे चालणे" या न्यायानी मी देखील म्हणू शकतेच की भले कुसुमाग्रजांनी कितीकांचा आंतर अग्नी फुलवला असेल, मीही माझी एक ठिणगी का फुलवत ठेऊ नये?

गाणं तुझं गात रहा, हळवं असो किंवा भेदक
मीही सुरात सुर मिसळीन

चित्र तुझं रेखत रहा, तरल असो किंवा भडक
मीही रंगात रंगून जाईन

खेळ तुझा खेळत रहा, पोरकट असो किंवा रंजक
मीही खेळात दंगून जाईन

नाच तुझा नाचत रहा, डौलदार असो किंवा राकट
मीही ताल धरून डोलीन

शास्त्र तुझं शोधत रहा, गूढ असो किंवा सुलभ
मीही ज्ञानकण वेचत राहीन!

कविता तुझी रचत रहा, मुक्‍त असो किंवा सुबक
मीही शब्द जुळवत राहीन