अशीच येते कधी एकदा उत्साहाला भरती ताजी
आणि मनाच्या आकाशातुन मनोरथांची आतषबाजी
असाच येतो कधी एकदा आठवणींना पूर केव्हढा
आणि मनाच्या कुपीत राही दरवळणारा गंध-केवडा
अशाच येती कधी एकदा सैरभैरही विचारधारा
आणि मनाच्या चित्री उमटे आकांक्षांचा मोरपिसारा
अशीच होते कधी एकदा श्रद्धासुमनांची उधळण
आणि मनाच्या गाभार्यातुन भावभक्तीची ओंजळ अर्पण
असेही येती कधी एकदा रिते हुंदके उदासवाणे
तरीहि मनाला हसवत खेळत गात रहावे जीवनगाणे
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
सुंदर. आपली कविता आवडली. शेवटची द्विपदी लयीत म्हणायला जरा अवघड वाटली. छंद किंचित मागे-पुढे झाला आहे का?
गुगलता गुगलता तुझ्या ब्लॉगवर अपघातानेच पोचलो आज. इतकी सुरेख कविता वाचायला जरा उशीरच झाला.
मस्त.
:)
Post a Comment